Sunday, October 21, 2012

नवी गुलामगिरी
आपल्या देशावर १५० वर्षे ब्रिटीशांनी राज्य केले , १५० वर्षे आपण गुलामगिरीत काढली.
ब्रिटीश(गोरे) लोक भारतात आले ते व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांनी हळुहळु देशाचा ताबाच घेतला त्यांनी आपले पाणी जोखलं होते अणि"“Divide & Rule” चा वापर करून त्यांनी आपल्यात दुही माजवली आणि आपल्याला गुलाम बनवले. राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी गोरे लोक ठेवले होते पण खालच्या स्तरावर मात्र भारतीय लोकच होते.
 हे असे का झाले कसे झाले हा या लेखाचा विषय नाही त्यावर भरपूर माहिती अनेक जागी उपलब्ध आहे

ब्रिटीश(गोरे) लोक जाउन आता ६४ वर्षे झाली आहेत आणि आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत पण आपण पुन्हा एकदा स्वतःहून एका वेगळ्या प्रकारच्या गुलामगिरी कडे वाटचाल करत आहोत असे मला वाटते
भारतीय लोकांना परदेशी वस्तूंचे आकर्षण आहे हे गोर्‍या लोकांनी ओळखले आहे ,त्यामुळे इथे येऊन सत्ताधारी होवून राज्यकारभार हाकण्यात त्यांना अजिबात रस नाही ते व्यापारी आहेत आणि आपला माल जास्तीत जास्त किमतीला खपवून नफा कमावणे एव्हढाच त्यांचा उद्देश आहे.
यापुढे परकीयांना आपल्यावर आक्रमण करून अथवा युद्ध करून देश ताब्यात घ्यायची गरजच नाही. आर्थिक गुलामगिरी आपण स्वतःहून ओढवून घेत आहोत.
आपण जरा निट विचार केला तर लक्षात येईल की आपण वापरत असलेल्या निम्म्याहून अधिक वस्तू या परदेशात तरी बनवलेल्या आहेत किंवा परदेशी कंपन्यांनी भारतात बनवलेल्या आहेत .
ह्या लेखाचा उद्देश स्वदेशी वापराचा संदेश देणे असाही नाही.
आपल्या घरात असलेल्या बर्‍याच वस्तू परकीय बनावटीच्या असतात टिव्ही ,फ्रिज ,मिक्सर
मोबाईल किंवा लॅंड्लाईन फ़ोन. कॉम्प्युटर. ,गाड्या, दुचाक्या वगैरे...
आपल्याकडे मोबाईल फोन बनतच नाहीत त्यामुळे सर्वच्या सर्व मोबाईल परकीय बनावटीचेच असतात कॉम्प्युटरची आपल्याकडे जुळणी होते त्यातले एलेक्ट्रॉनिक पार्ट परदेशातूनच येतात किंवा भारतात बनत असले तरी परदेशी कंपनीच्या कोलॅबरेशन मधेच बनत असतात
आणि वर उल्लेख केलेल्या वस्तू जरी भारतात बनत असल्या तरीसुद्धा त्यात वापरलेले स्पेअर्स परदेशातूनच येत असतात ….प्रत्येकाने पहिला फोन घेतल्यानंतर या ना त्या कारणाने दोन तिनदा तरी नवा फोन घेतलेला असतोच आणि बरेचसे असे फोन नंतर धूळ खात पडलेले असतात
दर दोन तीन वर्षांनी गाडी बदलण्याची खरेच गरज असते का?
अश्या अनेक वस्तू आपल्याकडे असतात आणि त्यासाठी आपण महागडे परकीय चलन मोजलेले असते

गोर्‍या लोकांनी भारतीय लोकांची ही गरज ओळखून आपल्याला अनेक नावीन्यपूर्ण गॅजेट्स उपलब्ध करून दिली आहेत आणि ठरावीक काळानंतर त्यात जरासे बदल करून नवीन व्हर्जन बाजारात आणले जाते कारण ते एक मार्केटींग गिमिक असते. त्यात फार काही वेगळे असते असे नाही पण नवे आलेय ना?  मग घ्या ते! या वृत्तीमुळे नव्याची खरेदी होते

लहान मुले जशी नवे खेळणे आणले की जुने टाकून देतात तशी आपल्याकडील बर्‍याच जणाची पद्धत झाली आहे या नवे आले की जुने फेका वृत्तीतून बरेच परकीय़ चलन वाया जात आहे असे मला वाटते.
मला एव्हढेच म्हणायचे आहे की ही वृत्ती आपण जर बदलली तर आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहील





Monday, August 06, 2012

बॉम्बस्फोट, टिव्ही चॅनेल आणि आपले माननिय (राजकारणी)

बॉम्बस्फोट, टिव्ही चॅनेल आणि आपले माननिय (राजकारणी)

परवा संध्याकाळी टिव्ही बघत असताना अचानक पुण्यात छोटा बॉम्बस्फोट अशी बातमी दिसली .

चॅनेलवर स्फोटाच्या जागी गेलेले त्यांचे प्रतिनीधी बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत माहिती देत होते आणि टिव्हीवर तिचं तिचं द्रुष्ये दाखवत असतानाच तेथे आलेल्या पोलीस कमिशनर साहेबांना चॅनेलवाले प्रश्न विचारत होते त्याच वेळी एका बाजूला माननियांची गर्दी होऊ लागली.
पोलीस कमिशनर साहेब गेल्यानंतर चॅनेलवाल्यांनी ताबडतोब आपला कॅमेरा आणि माईक त्यांच्याकडे वळविला आणि पुण्यातील माननियांच्या मुलाखती दाखवण्यास सुरूवात केली.

चॅनेल- हा दहशतवाद्यांचा हल्ला आहे असे आपल्याला वाटते का?

माननीय- अं अं

चॅनेल - हा स्फोट कोणी केला असेल असे आपल्याला वाटते?

माननीय- मला असे वाटते की ………………

चॅनेल- आपण पुणेकरांना  काय सांगाल?

माननीय—अं !! अं !! आमच्या पक्षाचा कार्यक्रम इथेच बालगंधर्व मधे होता आणि आपले मा.-अमुक अमुक इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आत असतानाच आम्हाला फोन आला आणि मग आम्ही सर्वच ( मा. अमुक अमुक तमुक तमुक ….नेत्यांच्या नावांची मोठ्ठी यादी…..)धावतच बाहेर आलो आणि आत्ताच आपल्या पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितले आहे की “घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही पुढील तपास चालू आहे आणि पुणेकरांना आमची विनंती आहे कृपया अफवा पसरवू नका ” वगैरे वगैरे

पुन्हा एकदा तेच पाल्हाळ वेगवेगळ्या माननियांनी लावले होते .
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पॉझ आणि पोझ  घेवून अं अं करत बोलत होते प्रत्येकजण आपण आपल्या वरिष्ठांना ही बातमी कशी दिली ह्याची सुद्धा माहीती देत होता.
ह्या मुलाखतीची खरोखरच गरज असते का?
लागोपाठ वेगवेगळ्या माननियांनी तिथे येण्याची खरोखरच गरज होती का?
पोलीस कमिशनरसाहेबांनी मुलाखत दिल्यानंतर माननियांना हे प्रश्न विचारण्याची काही गरज आहे का?
आणि आपण राजकारणात आहोत म्हणजे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला हवेच का??

Monday, July 30, 2012

क्रोशे-- छंद आणि कला

क्रोशेचा छंद


लहानपणासून जोपासलेला छंदातून माणसाला काय सुचेल हे सांगता येत नाही
एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करणा‍र्‍या  सौ स्वाती पटवर्धन यांना क्रोशेच्या सूया घेऊन नवनवीन पॅटर्न/डिझाईन  करत बसण्याची आवड आहे. ही आवड कशी निर्माण झाली हे त्यांनाही आठवत नाही
पण त्याची सुरुवात खूप लहानपणि झाली हे मात्र नक्की. सुरुवातीला  पुस्तकात बघून ,चुकत चुकत क्रोषे विणणे चालूच होते. कधी Table Cloth कधी घराच्या दारावर लावण्याच्या माळा ..जमेल ते सर्व काही करणे चालूच होते




आधी पुस्तकातील पॅटर्न करून बघताना नंतर त्यातच जरासा बदल करणे ,वेगवेगळे रंग वापरणे यातून त्यांची कला फुलतच गेली.शाळेतून  कॉलेजमधे गेल्यावनंतर देखीलदेखील हा छंद कायम होता.
शिक्षण संपल्यावर नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतर लग्न झाल्यावरसुद्धा त्यांचे क्रोशे चे प्रयोग चालूच होते पण नंतर नोकरीतील ,संसारातील जबाबदार्‍या आणि मुले लहान असताना त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही.
पण गेल्या १० वर्षात पुन्हा त्यांना सुया खुणावू  लागल्या आणि मग  कामाच्या रोजच्या धकाधकीतून मनाला उभारी  देणार्‍या या छंदाकडे त्या पुन्हा एकदा वळल्या .
त्यांनी एक दिवस असेच काही टॉप्स मुलीसाठी केले आणि काही तिच्या मैत्रीणिंना सुद्धा दिले ,बघता बघता  तिच्या वर्गातील इतर मुलीसुद्धा मागणी करू लागल्या ..जमेल तसे त्यांची मागणी पूर्ण करीत होत्या.

कॉलेजमधे शिकणार्‍या त्यांच्या मुलीला ,पूर्तीला, एव्हाना आपल्या आईच्या कलेने भुरळ घातली होती .तिच्या कानातील टॉप्सची डिमांड्पण वाढली होती . लहानपणापसून आई काय करतेय हे बघणारी पूर्ती शिकू लागली आणि आता पूर्ती स्वतः की चेन्स , टॉप्स,नेकलेस अशा वस्तू करते आणि त्याना उत्तम मागणी आहे.





गेल्याच आठवड्यात Pune Mirror ने Crochet वर एक feature केले होते त्यात  पूर्तीच्या  कलेसंबंधी लिहीले आहे आणि काही फोटो पण छापले .त्याची ही लिंक...
http://www.punemirror.in/article/31/2012072520120725085022546af4c329/Knots-and-crosses.html

फ़ेसबुकवरील तिच्या Yellow Hook पेजवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल .
जरूर भेट द्या.
https://www.facebook.com/pages/The-Yellow-Hook/282242225133643

Thursday, November 24, 2011


अण्णा..... अहो जरा विचार करून बोला


शरद पवारांसारख्या बुजूर्ग नेत्यावर एका माथेफिरूने हला केला या घटनेचा प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने निषेध केला.
पण अण्णा हजारेंना याबद्दल विचारले असता अण्णांची पहिली प्रतिक्रिया होती
क्या एकही मारा?" …..एकदाच मारले?
व्हिडीओ लिंक http://www.youtube.com/watch?v=xWH4_NxU5E0
काय अण्णा!! काय बोलताय तुंम्ही!! अहो पवारसाहेबांबद्दल तुम्हाला राग असेलही पण हे जे काय तुम्ही बोललात ते चूकच आहे. सर्वच राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे पण म्हणून कोणि त्यांना मारहाण करायला जात नाही.
निषेध करण्याच्या अनेक पद्धती आणि सर्वमान्य मार्ग आहेतच की.
नंतर तुम्ही या घटनेचा आता कितीही वेळा निषेध केलात तरी तुमच्या मनात काय आहे ते कळलेच.
राळेगणसिद्धीतल्या दारूडयाला खांबाला बांधून मारणे वेगळे आहे आणि खरेतर चूकही आहे.
आणि अण्णा जनतेने तुंम्हाला मोठेपणा दिला याचा अर्थ असा नव्हे की आपण प्रत्येक विषयात आपण बोलायलाच पाहीजे

मी कायम  महात्मा गांधींच्या विचाराने जाणारा आहे असे तुंम्ही म्हणता मग हे काय बोलताय?

तुमच्या प्रतीक्रियेवर शरद पवारसाहेब बरोबर म्हणाले की " गांधीवादाची नवी व्याख्या आम्हाल कळली"

अण्णा हल्ली प्रत्येक घटनेबद्दल तुम्हाला पत्रकार आणि सामान्य लोक तुमचे मत काय असे विचारतात ,तुमचे नाव भारत भरच काय कदाहित जगभरही झाले असेल ,अण्णा तुमच्यामुळे लोकपाल येईल, तुमच्यामुळे माहीतीचा कायदा आला ,तुमच्यामुळे ग्रामविकास झाला हे अगदी बरोब्बर. 
पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मतप्रदर्शन करायला हवेच का?   

Wednesday, November 09, 2011

लग्नसमारंभ आणि प्रथा........................ 
एका मंगल कार्यालयाच्या पायर्‍या चढत असताना "आले आले" असा गलका ऐकू आला आणि मागाहून होणारी गडबड बघून जरा बाजूला झालो.
 नवरदेवांचे आगमन झाले होते आणि वधूकडील नातेवाईक मंडळींची धावपळ सुरू झाली होती.
 दारात येउन वधूच्या आईने वराला औक्षण केले त्याचे आणि वरमाईचे पाय दूधाने धुतले आणि पायघड्या घालत त्यांना आत नेले.
 नंतर दिवसभर अशाच पद्धतीने मुलाकडच्यांपुढे हांजी हांजी करणे चालूच होते.
 फोटो काढायचेत आधी मुलाकडच्यांचे काढणार.....
पंगत बसलीय आधी मुलाकडच्यांचे जेवायला बसणार....
असे अनेक प्रसंग दिवसभर घडत होते आणि मुलीचे नातेवाईक तत्परतेने आणि ब‍र्‍याच वेळा नाइलाजास्तव करत होते.
बर्‍याच वेळा लग्नांमधे वादाचे प्रसंग येतात आणि त्याला अश्या जुनाट प्रथाच कारणीभूत असतात. आपल्याकडील बहुतेक लग्ने अशीच होतात मी हे जे काही पाहीले अनुभवले ते काही विशेष होते असे नाही, पण हे असे का आणि कशासाठी असा प्रश्न मला कायम पडतो.
 नवरामुलगा आणि त्याचे नातेवाईक यांना खास वागणूक देण्याची ही पद्धत स्त्रीयांना ५०% आरक्षण देण्यार्‍या या एकविसाव्या शतकात अजुनही सुरूच आहे याचे मलातरी नेहेमीच आश्चर्य वाटते.
 मला असे नाही म्हणायचे की मु्लाकडच्यांना मान अजीबात देउ नये,.... जरूर द्यावा... पण तितकाच मान मुलीकडच्यांना पण द्यायला नको का?
 मुलीकडची बाजू म्हणजे पडती बाजू असे का असते?
 लग्न म्हणजे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन घराण्यांना एकत्र आणणारी गोष्ट असेल तर एकमेकांना योग्य तो मानसन्मान देउन करायला काय हरकत आहे!!!
 हे सर्व लिहीण्याचे कारण की काही दिवसापूर्वी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाउन आलो तेथील हा अत्यंत आनंददायी वेगळा अनुभव..............
 हा लग्नसमारंभ म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींचे get together होते.
एकही दुर्मुखलेला चेहरा दिसला नाही.
 लग्न नोंदणी पद्धतीने झाले आणि नंतर स्वागत समारंभ होता. पण आपण नेहेमी बघतो तसा मात्र नाही.

नेहमीच्या स्वागत समारंभाला फाटा देऊन एक उत्तम पार्टी झाली.
प्रवेशद्वारात मुलामुलीचे आई वडील हसतमुखाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहीले होते अणि जिव्हाळ्याने प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे स्वागत करत होते.
बर्‍यार्पै‍की मंडळी जमल्यावर नवरा नवरीने प्रवेश  केला आणि जमलेल्या सर्वांनी त्यांचे उभे राहून
टाळ्यांच्या कडकडात  स्वागत केले .
 पार्टी सुरू करण्यापूर्वी नवरा नवरी मध्यभागी उभे राहीले आणि त्यांच्या एका मित्राने त्यांचे लग्न कसे ठरले त्याची स्टोरी खुसखुशीतपणे सांगीतली आणि नंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची ओळख सगळ्यांना करून दिल्यानंतर एका भन्नाट  आणि धमाल पार्टीला सुरुवात झाली.

 पार्टीत सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती, Orchestra होता, उत्तम संगीत होते, डान्सफ़्लोअर होता

 मुख्य म्हणजे मुलगा मुलगी स्टेजवर खोटं खॊटं हसत पाहुण्यांना भेटण्याऐवजी पाहुण्यांमधे हिंडत फिरत त्यांना भेटत होते आणि दोघेही उत्तम डान्सर असल्यामुळे डान्सपण करत होते.
त्यांना एका उत्तम बॅंडची साथ होती.
 दोघांनी आलेल्या प्रत्येकाला थोडा वेळ का होइना डान्स करायला लावलाच . पुढ्चे तीन तास कसे गेले हे कोणालाच कळ्ले नाही .
 समारंभाची सांगता मुलीच्या मोठ्या भावाने स्वत: लिहीलेले आणि चाल दिलेल्या गाण्याने झाली .

 काळानुरूप आपणही बदलायला काय हरकत आहे.
 नवपरिणीत वधुवर आणि आलेल्या सर्वांनाच माझा सलाम.....................

Monday, June 06, 2011

उपोषण आणि प्रसिद्धी


उपोषण आणि प्रसिद्धी

सरकारने रामदेवबाबांची उचलबांगडी केली आणि त्यांच्या अनुयायांवर लाठीमार व अश्रुधूर सोडून त्यांना रामलीला मैदानावरून हुसकावले.
रामदेवबाबा आधी लपून बसले आणि नंतर स्त्री वेषात पळून जाताना त्यांना पोलिसांनी कसे पकडले ह्याची द्रुष्ये काल दिवसभर प्रत्येक चॅनेल्सवर दाखवली जात होती.
खरे तर रामदेव बाबांना पळून जाण्याची काय जरूर होती ?
स्त्री वेषात पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सरळ पोलीसांना सामोरे जाउन "करा मला अटक " असे म्हटले असते तर पोलीसांनी काय केले असते ? उलट रामदेवबाबाबा निर्भिड आहेत असे वाटले असते.

लपाछपी करायची यांना काय गरज होती? बाबा लपलेत म्हटल्यावर त्यांच्या अनुयायांची पळापळ सुरु झाली. रामदेवबाबांनी न लपता त्यांच्या अनुयायांना समजावले असते तर त्यांच्या अनुयायांची पळापळ झाली ती अजिबात झाली नसती आणि पोलीसांचे काम सोपे झाले असते .
आणि पोलीस म्हणतातच आहेत की आम्ही त्यांना अटक केलेली नाही आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राहील एवढेच बघीतले आणि दिल्लीत गोंधळ होवू नये म्हणून त्यांना हरिद्वारला नेले.
काहीही झाले सरकारच्या आदेशांच्या शिवाय पोलीस असे काही करणार नाहीत, रामदेवबाबांना अटक करणे दूरच.

नंतर रामदेवबाबा सांगत होते की पोलीस माझा एन्काउंटर करणार होते.
रामदेवबाबांचे गेले काही दिवस लांगुलचालन करणारे सरकार का मारेल बाबांना?

अशी दडपशाही करून आंदोलन चिरडणे अत्यंत चुकीचे आहे आणि तसे करून सरकारने चूकच केलेली आहे पण राजकारणाकडे वाटचाल करू पाहणार्‍या बाबांचे पण चुकलेच आहे . अशा स्टंटबाजीने काय साधणार आहे?
मुळात या उपोषणाची काही गरज होती का? आणि रामदेव बाबांच्या सगळ्याच मागण्या योग्य आहेत का?

अण्णांनी आपल्या उपोषणाचा काळ हुषारीने निवडला होता विश्वचषकाचे सामने संपल्यानंतर लगेचच आणि
आय. पि. एल. संपायच्या आत. कारण अण्णांना नक्की माहिती होते की या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट सामन्यांच्या काळात आपल्याकडे फार कोणी फिरकणार नाही त्यामुळे अण्णांनी विश्वचषक आणि आय पि एल यांच्या मधील दिवसात उपोषण करून मिळवली .
आण्णा आणि बाबा यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत त्यामुळे आपणही काहीतरी करायला पाहिजे असे बाबांना वाटत असावे.

सध्याचे सरकार भ्रष्ट आहेच आणि विरोधी पक्ष देखील सरकारवर दबाव आणण्याचे सोडून काही ही करून सत्ता प्राप्त कशी होईल याकडे बघत आहेत.अशा परिस्थितीत सामान्य नागरिक अण्णा हजारे आणि रामदेवबाबांच्या मागे जात आहेत.
पण प्रसिद्धीच्या मागे लागून हे दोघेही मूळ मुद्द्यांपासून दूर जात आहेत हे मात्र नक्की.