Friday, March 23, 2007

तळीराम
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही.मी संध्याकाळी घरी येतो, तेंव्हा बायको स्वैपाक करत असते.शेल्फ़ मधील भांडयांचा आवाज बाहेर येत असतो.मी चोर पावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतॊ.शिवाजी महाराज फ़ोटोतून बघत असतात,तरी ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,कारण मी कधीच रिस्क घेत नाही. . . . . !!१!! पेग
वापरात नसलेल्या मोरितल्या फ़ळीवरुन मी ग्लास काढतो,पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो.ग्लास धुवून पुन्हा फ़ळीवर ठेवतो,अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो.शिवाजी महाराज मंद हसत असतात,स्वैपाकघरात डोकावून बघतो,बायको कणिकच मळत असते,ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,कारण मी कधीच रिस्क घेत नाही. . . . . !!२!! पेग
मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?ती: छे ! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!मी परत बाहेर येतो. काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,बादली मात्र मी हळुच काढतो,वापरात नसलेल्या फ़ळीच्या मोरीवरुन ग्लास काढतो,पटकन पेगचा आस्वाद घेतो,बाटली धुवून मोरित ठेवतो,काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,तरी ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,कारण मी कधीच रिस्क घेत नाही. . . . . !!३!! पेग
मी: अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं पक्क झालं नाही?ती: नाही काऽऽय! अट्ठावीस वर्षाची घोडी झालिये म्हणे...मी: (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा...मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो,मात्र कपाटाचि जागा आपोआप बदललेली असते.फ़ळीवरुन बाटली काढुन पटकन मोरीत एक पेग मारतोशिवाजी महाराज मोठ्ट्याने हसतात,फ़ळी कणकेवर ठेवुन शिवाजींचा फ़ोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,बायको ग्यासवर मोरीच ठेवत असते,या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागात नाही.कारण मी कधीच रिस्क घेत नाही. . . . . !!४!! पेग