Tuesday, May 31, 2011

नामांतर

नामांतर......??????
राजकारणी लोकांना आपले नाव चर्चेत ठेवण्यासाठी नामांतर हा हमखास उपाय आहे ह्याची बहुधा खात्रीच पटली असावी.
मग त्यासाठी त्यांना कुठल्यातरी विद्यापीठाचे नाव बदलावेसे वाटते तर कधी एखाद्या गावाचे.
ब्रिटीशांनी ठेवलेली नावे बदलणे योग्य होते पण काहीवेळा अती उत्साहाच्या भरात बोलल्यामुळे हसे पण होते.
पुण्याच्या एका माजी महापौरांनी ससून रुग्णालयाचे नाव बदलण्याचे ठरवले होते आणि तसा ठराव मांडण्याची तयारी पण केली होती. त्यांना नंतर कळले की मुंबईतील डेव्हीड ससून नावाच्या   ज्यू गृहस्थांनी १८६७ साली दिलेल्या उदार देणगीतून  हे रूग्णालय उभे राहीले आहे .
डेक्कन जिमखाना नाव बदलून त्याला संभाजीनगर नाव देण्याचा पराक्रम माजी उपमुख्यमंत्री मुंढेसाह्र्बांनी केलेला आहे. पण किती जण ते वापरतात ? कोणीही नाही. आणि पुण्यात येउन कोणी "संभाजीनगरला कसे जायचे" असे विचारले तर कोणालाही काहीही सांगता येणार नाही. नावापुरती एक पाटी गोखले चौकात(गुडलक चौ्कात) लावलेली आहे.

रस्त्यांना आणि चौकांना माननियांच्या नातेवाईकांची नावे दिली जातात ,कशासाठी ? चौका चौकात कोणालाही माहीती नसलेल्याचे पुतळे उभारतात , कशासाठी?
बांद्रा वरळी समुद्र सेतूला राजीव गांधींचे नाव घाईघाई करून देण्यात आले. किती जण हे नाव वापरतात हा संशोधनाचा विषय ठरेल.

विद्यापिठ ज्या गावात असेल त्या गावाचे ना्वाने ते ओळखले जाणे हेच संयुक्तीक नाही का?
दोन गावांना जोडणारा रस्ता त्या गावांच्या नावानेच ओळखला जाणे हेच संयुक्तीक नाही का?
 

Monday, May 30, 2011

चिन्मय गणाधिश टोप-संभापूर कोल्हापूर

चिन्मय गणाधिश टोप -संभापूर कोल्हापूर



कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक प्रचंड गणेशमूर्ती दिसते .
पुण्याहून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ हायवेपासून अंदाजे दिड किमी वर हा गणपती आहे हायवेवरून तो दिसतोच. पण या वेळी मात्र जवळून दर्शन घेवून आलो . येथे पार्किंगची उत्तम सोय आहे. साधारण पन्नास पायर्‍या चढून जावे लागते परंतू बरोबर वयस्क किंवा अपंग असतील तर वरपर्यंत गाडी नेता येते.चिन्मय मिशनने इथला परिसर अतिशय स्वच्छ ठेवला आहे




साधारण ८०० टन वजनाची ही मूर्ती ६१ फूट उंच आहे आणि २५ फूट उंचिच्या "ध्याननिलयम" सह जवळ जवळ ८५ फूट उंच आहे एवढा प्रचंड आकार असूनसुद्धा मूर्ती अतिशय सुबक आहे. चिन्मय मिशनने कर्नाटकातून ५० कारागीरांकडून १८ महीन्यात ही मूर्ती बनवून घेतली आहे. 
मूर्ती डाव्या सोंडेची आहे पुढचा उजवा हात वरदहस्त आहे .मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश व पुढील डाव्या हातात मोदक आहे.