उपोषण आणि प्रसिद्धी
सरकारने रामदेवबाबांची उचलबांगडी केली आणि त्यांच्या अनुयायांवर लाठीमार व अश्रुधूर सोडून त्यांना रामलीला मैदानावरून हुसकावले.
रामदेवबाबा आधी लपून बसले आणि नंतर स्त्री वेषात पळून जाताना त्यांना पोलिसांनी कसे पकडले ह्याची द्रुष्ये काल दिवसभर प्रत्येक चॅनेल्सवर दाखवली जात होती.
खरे तर रामदेव बाबांना पळून जाण्याची काय जरूर होती ?
स्त्री वेषात पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सरळ पोलीसांना सामोरे जाउन "करा मला अटक " असे म्हटले असते तर पोलीसांनी काय केले असते ? उलट रामदेवबाबाबा निर्भिड आहेत असे वाटले असते.
लपाछपी करायची यांना काय गरज होती? बाबा लपलेत म्हटल्यावर त्यांच्या अनुयायांची पळापळ सुरु झाली. रामदेवबाबांनी न लपता त्यांच्या अनुयायांना समजावले असते तर त्यांच्या अनुयायांची पळापळ झाली ती अजिबात झाली नसती आणि पोलीसांचे काम सोपे झाले असते .
आणि पोलीस म्हणतातच आहेत की आम्ही त्यांना अटक केलेली नाही आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राहील एवढेच बघीतले आणि दिल्लीत गोंधळ होवू नये म्हणून त्यांना हरिद्वारला नेले.
काहीही झाले सरकारच्या आदेशांच्या शिवाय पोलीस असे काही करणार नाहीत, रामदेवबाबांना अटक करणे दूरच.
नंतर रामदेवबाबा सांगत होते की पोलीस माझा एन्काउंटर करणार होते.
रामदेवबाबांचे गेले काही दिवस लांगुलचालन करणारे सरकार का मारेल बाबांना?
अशी दडपशाही करून आंदोलन चिरडणे अत्यंत चुकीचे आहे आणि तसे करून सरकारने चूकच केलेली आहे पण राजकारणाकडे वाटचाल करू पाहणार्या बाबांचे पण चुकलेच आहे . अशा स्टंटबाजीने काय साधणार आहे?
मुळात या उपोषणाची काही गरज होती का? आणि रामदेव बाबांच्या सगळ्याच मागण्या योग्य आहेत का?
अण्णांनी आपल्या उपोषणाचा काळ हुषारीने निवडला होता विश्वचषकाचे सामने संपल्यानंतर लगेचच आणि
आय. पि. एल. संपायच्या आत. कारण अण्णांना नक्की माहिती होते की या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट सामन्यांच्या काळात आपल्याकडे फार कोणी फिरकणार नाही त्यामुळे अण्णांनी विश्वचषक आणि आय पि एल यांच्या मधील दिवसात उपोषण करून मिळवली .
आण्णा आणि बाबा यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत त्यामुळे आपणही काहीतरी करायला पाहिजे असे बाबांना वाटत असावे.
सध्याचे सरकार भ्रष्ट आहेच आणि विरोधी पक्ष देखील सरकारवर दबाव आणण्याचे सोडून काही ही करून सत्ता प्राप्त कशी होईल याकडे बघत आहेत.अशा परिस्थितीत सामान्य नागरिक अण्णा हजारे आणि रामदेवबाबांच्या मागे जात आहेत.
पण प्रसिद्धीच्या मागे लागून हे दोघेही मूळ मुद्द्यांपासून दूर जात आहेत हे मात्र नक्की.